Sangli Crime : कामगार संघटना अध्यक्षाला मारहाण; माजी जिल्हाध्यक्षासह दोघांवर गुन्हा

साखराळे येथील प्रकार; पदावरून हटवल्याच्या रागातून वाद
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

ईश्वरपूर : साखराळे (ता. वाळवा) येथे जिल्हाध्यक्ष पदावरून काढल्याच्या रागातून कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षा शीतल गायकवाड आणि त्यांचे पती अनिल (दोघे रा. मोही, ता. खानापूर) यांच्याविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सुभाष पाटोळे (रा. साखराळे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शीतल गायकवाड या पाटोळे यांच्या संघटनेत कार्यरत होत्या. मात्र, ऑगस्ट 2025 मध्ये संदीप पाटोळे यांनी त्यांना संघटनेतून काढून टाकले होते. त्यानंतर पाटोळे यांनी स्वतः खानापूर तालुक्यात लक्ष घालून संघटना वाढवण्यास सुरुवात केली. या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद धुमसत होता. 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास संदीप पाटोळे हे आपल्या घरी असताना, संशयित शीतल, अनिल आणि त्यांचे साथीदार शबाना, अमोल, प्रीती आदी दोन मोटारींतून साखराळे येथे पोहोचले. शीतल गायकवाड यांनी घराची कडी जोरात वाजवून पाटोळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. ‌‘बाहेर ये, तुला सोडणार नाही, तुझे घर पेटवून देऊ, कडी लावून आत का बसला आहेस?‌’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संदीप पाटोळे घराबाहेर आले असता, शीतल आणि अनिल यांनी त्यांना मारहाण व शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news