Sangli Accident : कुपवाड येथे भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कवलापूर रस्त्यावर भीषण अपघात : ट्रॅक्टरचालक पोलिसांच्या ताब्यात
Sangli Accident News
कुपवाड येथे भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Published on
Updated on

कुपवाड : कुपवाड ते कवलापूर रस्त्यावरील झिल इंटरनॅशनल स्कूलसमोर दुचाकी व ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहायक सतीश रामचंद्र पाटील (वय ५०, रा. कवलापूर, ता. मिरज) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि. २७) रोजी रात्री घडली.

गुरुवारी रात्री सतीश पाटील हे दुचाकीवरून (एम.एच. १० डीएन ६८६७) कुपवाडमार्गे कवलापूर येथील आपल्या घरी चालले होते. यावेळी त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरची (एम.एच. १० एस ३६५६) आणि त्यांच्या दुचाकीची धडक झाली. अपघातात सतीश पाटील हे रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला गंभीर मार लागून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.

घटनेची माहिती मिळताच ‘आयुष हेल्पलाईन’ टीम आणि कुपवाड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी पाटील यांना उपचारांसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

मृत सतीश पाटील हे कवलापूर येथील स्वामी समर्थ पतसंस्था आणि मीनाताई ठाकरे कन्या शाळेचे संचालक म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. ट्रॅक्टरचालक विशाल अजित भोसले (वय ३०, रा. कवलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news