

कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रक चालकाने दुचाकीला धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला. अमित मल्लाप्पा आजकनार (35, रा. बामणोली, ता. मिरज) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री उशिरा घडली. अपघात झाल्यावर ट्रकचालक पसार झाला. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी अनोळखी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
औद्योगिक वसाहतीमधील पाण्याच्या टाकीसमोर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमीच्या चेहऱ्याला गंभीर मार लागल्याने लवकर ओळख पटलेली नव्हती. जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.