

कुपवाड आणि मिरज औद्योगिक वसाहतीत सध्या सुमारे 25 हजार कामगार कार्यरत असून, यापैकी आठ हजार कामगार परप्रांतीय आहेत. विविध फाऊंड्री, प्लास्टिक, पीव्हीसी, रबर व केमिकल उद्योगांमध्ये कष्टाची, ओझे उचलण्याची, घाण लागणारी कामे मुख्यतः हेच कामगार करत आहेत. स्थानिक मराठी तरुण मात्र अशी कामे टाळतात. स्थानिक कामगार आठ तास काम करून सुट्टी घेतात, तर परप्रांतीय बारा-बारा तास काम करतात.
कुपवाड, मिरज औद्योगिक वसाहतीत पूर्वी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणावर कामगार येत असत, मात्र सध्या त्या प्रमाणात घट झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये उद्योगधंदे, धार्मिक पर्यटन, बांधकाम व्यवसाय यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी वाढत आहेत. परिणामी त्या भागातून महाराष्ट्रात येणार्या कामगारांची संख्या कमी झाली. आता आसाम, बिहार आणि कोलकाता येथील कामगार मोठ्या संख्येने आहेत. स्थानिक तरुणांच्या तुलनेत हे कामगार दिवसातून 12 तास काम करतात, आणि त्यांना दररोज 650 ते 750 रुपयांपर्यंत हजेरी मिळते. मराठी कामगार बहुतांश 8 तास काम करून 500 रुपये हजेरी घेतात, अशी माहिती काही उद्योजकांकडून मिळाली.