Sangli News : सांगली, कुपवाडसाठी 2 कोटी लिटर जादा पाणीपुरवठा

महासभेत निर्णय : पाणी टंचाईवरून वादळी चर्चा; सांगली-कुपवाड वाद : ‌‘वारणा उद्भव‌’साठी शासनाकडे पाठपुरावा
Sangli Municipal Corporation
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकाPudhari
Published on
Updated on

सांगली : सांगली, मिरज तसेच कुपवाड शहरातील पाणीटंचाईवरून सोमवारी महासभेत वादळी चर्चा झाली. असमान पाणी वितरणावरून सांगली-कुपवाड असा वादही रंगला. दरम्यान, सांगली व कुपवाड शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृष्णा नदीतून 2 कोटी लिटर जादा पाणीउपसा करण्याचा निर्णय झाला. पाणी समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी वारणा उद्भव पाणी योजना हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे राजकीय ताकद वापरून या योजनेच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले. सध्या प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करू, पण तिन्ही शहरांना पाणी कमी पडू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला.

पाणी प्रश्नावर सोमवारी महापालिकेची विशेष महासभा झाली. महापौर धीरज सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर गजानन मगदूम, आयुक्त सत्यम गांधी, सर्व नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. सुमारे साडेतीन तास या विषयावर वादळी चर्चा झाली. नगरसेविका अश्विनी कदम व अभिजित कोळी यांनी सांगलीवाडीत अपुरा पाणी पुरवठा होत असल्याकडे लक्ष वेधले. दिग्विजय सूर्यवंशी यांनी पाणीपुरवठ्यासाठी झोनिंगची गरज व्यक्त केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी सभागृहात गढूळ पाण्याची बाटली आणत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जगन्नाथ ठोकळे यांनी, कर्मचाऱ्यांअभावी दोन-तीन महिने पाण्याचे लिकेज काढले जात नसल्याचे सांगितले. कीर्ती देशमुख यांनी पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची तक्रार केली. हिराबाग वॉटर वर्क्स पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी मयूर पाटील यांनी केली.

रमेश सर्जे यांनी वारणा उद्भव योजनेची गरज व्यक्त केली. पाणी उपसा क्षमता वाढविण्याची मागणी सोनल पाटील-सावर्डेकर यांनी केली. मंगेश चव्हाण, फिरोज पठाण यांनी पाणी टंचाईकडे लक्ष वेधले. आपला प्रभाग नदीजवळ असूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार युवराज बावडेकर यांनी केली. अपार्टमेंटला कमी कनेक्शन्स आणि पाणी मात्र मुबलक, याकडे लक्ष्मण माने यांनी लक्ष वेधले.

विष्णू माने म्हणाले, कुपवाड शहर व विस्तारित भागात पाणी प्रश्न गंभीर आहे. पुन्हा एमआयडीसीकडून पाणी विकत घ्यावे, एक दिवसआड पाणी सर्वच प्रभागात दिल्यास सगळीकडे पुरेसे व जास्त दाबाने पाणी मिळेल. प्रकाश पाटील, प्राजक्ता धोत्रे, मीनाक्षी पाटील, योगिता राठोड, दीपक वायदंडे यांनीही पाणीप्रश्नी आवाज उठवला. 20 वर्षांपूर्वीचे कालबाह्य विद्युत पंप बदलावेत, अखंडित वीज पुरवठा करावा, उपसमिती नेमावी, अशी सूचना अभिजित भोसले यांनी केली. सभेत राजेश नाईक, संतोष पाटील, प्रकाश मुळके, नसिमा नाईक, गाथा जगदाळे, वर्षा निंबाळकर, सलमा शिकलगार यांनी समस्या मांडल्या. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी नगरसवेकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मिरजेतील पाणी टंचाईवरून निरंजन आवटी, बिलकिस बुजरूक, विद्या नलावडे, दयानंद खोत, मोहन वाटवे, अपर्णा शेटे, सागर वनखंडे, शैला दुर्वे व अन्य नगरसेवकांनी आवाज उठवला.

कुपवाडच्या वाट्याचे पाणी सांगलीला वापरले जात आहे. सांगली शहरात अनेक ठिकाणी दोनदा पाणीपुरवठा होतो, पण कुपवाड शहर व विस्तारित अनेक भागात पाणीटंचाई जाणवत असल्याचा मुद्दा विष्णू माने यांनी उपस्थित केला. प्रथम कुपवाडच्या टाक्या भरून घ्या, असा मुद्दाही त्यांनी मांडला. त्यावरून सांगली-कुपवाड असा वाद रंगला.

आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, सांगली व कुपवाडमध्ये झोनिंगअभावी पाणीप्रश्न उद्भवत आहे. यासाठी 20 कोटींपर्यंत खर्च आहे. निधी उपलब्ध झाल्यावर याबाबत विचार होईल. महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, सांगली व कुपवाड शहराचा पाणीप्रश्न गंभीर आहे. झोनिंग, कर्मचारी पुरवठा, विजेचा प्रश्न आदी उपाय करण्यात येतीलच, पण या दोन्ही शहरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल, तर वारणा उद्भव योजना राबवणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news