

कुपवाड : शहरातील महावीर व्यायामशाळा ते विजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका खासगी कंपनीमार्फत चर खोदाईचे काम सुरू असताना कुपवाड गावठाणासह परिसराला पाणीपुरवठा करणारी वाहिनी (पाईपलाईन) फुटली. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
वाहिनी फुटल्यामुळे काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे, तर काही भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या तसेच दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
खोदकामामुळे वाहिनीचे नुकसान झाल्यास संबंधित ठेकेदार किंवा यंत्रणेची जबाबदारी निश्चित करून नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एकीकडे नागरिक पाणीटंचाईचा सामना करत असताना दुसरीकडे वाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जाणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, उल्हासनगर परिसरात काही महिन्यांपासून
कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. काही दिवस पाणीच येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करून पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.