Sangli News : पन्नास टक्केही काम नाही; 140 कोटी दिले

Sangli News : पन्नास टक्केही काम नाही; 140 कोटी दिले

विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण : कुपवाड ड्रेनेज योजनेची श्वेतपत्रिका काढा
Published on

सांगली : कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामाची मुदत जानेवारी 2026 मध्ये संपली आहे. ठेकेदाराने 50 टक्केही काम पूर्ण केलेले नाही. तरीही ठेकेदाराला 206 कोटींपैकी सुमारे 140 कोटी रुपयांची बिले दिली आहेत. निविदेनुसार काम झालेले नाही. कामाच्या दर्जाबाबतही नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, या योजनेची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केली आहे. याबाबत नगरविकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

कुपवाड ड्रेनेज योजनेबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सोमवारी विरोधी पक्षनेते चव्हाण यांनी सोमवारी या योजनेचे काम सुरू असलेल्या विविध भागात पाहणी केली. ड्रेनेज विभागाचे अभियंता तेजस शहा, अभियंता चेतन मोदी, सहायक आयुक्त सचिन सागावकर, नगरसेवक प्रकाश पाटील, सनी धोतरे, कुमार पाटील उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे कुपवाड ड्रेनेज योजनेबाबत अनेक तक्रारी केल्या.

मंगेश चव्हाण म्हणाले, 253 कोटी रुपयांच्या कुपवाड ड्रेनेज योजनेला डिसेंबर 2022 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. या योजनेंतर्गत 206.46 कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा निघाल्या. मेहसाना येथील जयंती सुपर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीला काम मिळाले. या ठेकेदारास दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. जानेवारी 2026 मध्ये योजना कार्यान्वित होणे गरजेचे होते. मात्र पन्नास टक्केही काम झालेले नाही. या योजनेंतर्गत 270 किलोमीटरपैकी 240 किलोमीटर ड्रेनेजलाईनचे काम झाले असल्याचे ठेकेदाराकडून सांगितले जाते, पण प्रत्यक्षात तेवढे काम झालेले नाही. ड्रेनेज लाईनसाठी रस्ता खोदल्यानंतर तो पूर्ववत करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. मात्र चरीतून निघालेल्या मातीनेच चरी मुजवल्या आहेत. मुरूम घातलेला नाही. रस्ता तयार करताना विविध थर असतात, तसे थर नाहीत. ड्रेनेज लाईनला 30 मीटर अंतरावर मेन चेंबर असणे गरजेचे आहे. मात्र तसे झालेले नाही. योजनेचे 50 टक्केही काम झालेले नसताना 206 कोटी रुपयांपैकी 140 कोटी रुपयांचे बिल ठेकेदाराला दिलेले आहे.

ड्रेनेजलाईन टाकताना पाणी कनेक्शन तुटले तर ते पूर्ववत जोडून देण्याची जबाबदारी ठेकेदारावर आहे. पण ती जबाबदारी ठेकेदार घेत नाही. ड्रेनेजलाईन खोदाईमुळे कुपवाड-बुधगाव रस्ता वीस दिवस बंद आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण होणे गरजेचे आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news