

कुपवाड ः शहरातील कापसे प्लॉटशेजारील बेघर वसाहतमधील पत्र्याच्या शेडमध्ये सेंट्रिंग कामगाराचा खून झाला. ही घटना सोमवार, दि. 6 रोजी सकाळी उघडकीस आली. दगडू सुखदेव केंगार (वय 52, रा. विघ्नहर्ता कॉलनी, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह मृत केंगार यांच्या नातेवाईक महिलेला ताब्यात घेतले.
केंगार सेंट्रिंगचे काम करत होते. ते विघ्नहर्ता कॉलनीतील पत्र्याच्या शेडमध्ये एकटेच राहत. त्यांची पत्नी आणि मुलगा लगतच्या बेघर वसाहतीत राहतात. केंगार काही दिवसांपासून इचलकरंजी येथे कामासाठी गेले होते. रविवारी सुटी असल्याने ते कुपवाडमधील घरी परतले होते. रात्री केंगार यांचा कुटुंबातील व्यक्तींशी कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याची चर्चा परिसरात होती.
सोमवारी सकाळी केंगार यांच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आले. त्याने आत जाऊन पाहिले असता वडील रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे दिसले. मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. केंगार यांच्या पाठीवर आणि पायावर जखमा तसेच नाकातून रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.