

कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील द्राक्ष बागायतदारांना 14 लाख 49 हजार 231 हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंध्र प्रदेशातील तीन द्राक्ष व्यापाऱ्यांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिरगम कोंडलराम, सिरगम मुरली कृष्णा व सिरगम रमेश (तिघे रा. आंध्र प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद कृष्णदेव पंडित डुबुले यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुची येथील कृष्णदेव पंडित डुबुले यांच्या शेतातील 9 लाख 26 हजार 511 रुपये किमतीची 21 टन 584 किलो द्राक्षे (6564 पेट्या), तात्यासाहेब राजाराम पाटील यांच्या शेतातील 1 लाख 99 हजार 320 रुपये किमतीची 4 टन 980 किलो द्राक्षे (1245 पेट्या) आणि मुरारराव ज्ञानदेव पाटील यांच्या शेतातील 3 लाख 23 हजार 400 रुपये किमतीची 9 टन 240 किलो द्राक्षे (2310 पेट्या) असा एकूण 14 लाख 49 हजार 231 रुपयांचा माल मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत साई फ्रूट कंपनीच्या माध्यमातून खरेदी केला. द्राक्षे ताब्यात घेतल्यानंतर संशयितांनी पैसे न देता फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
प्रकरणात आणखी काही शेतकरीही फसवले गेले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई करून बागायतदारांना न्याय मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव पाटील करीत आहेत.