

सांगली : येथील कृष्णा नदी पात्रात मासे पकडण्यासाठी उतरलेल्या दोघांना मगरीच्या वावरामुळे बाहेर पडणे कठीण झाले होते. अखेर स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तासाभराच्या थरारानंतर सुटका झाल्याने या दोघांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
तोफिक अल्लाउद्दीन कुरणे (वय 35, रा. संजयनगर, सांगली) आणि संजय संभाजी लोंढे (वय 38, रा. गणेशनगर, सांगली) हे दोघेजण मच्छीमारीसाठी कृष्णा नदी पात्रात उतरले होते. तीन तास मच्छीमारी केल्यानंतर त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी मगरीचा वावर असल्याने ते दोघेही भीतीपोटी बाहेर येऊ शकले नाहीत. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी पाऊल टाकताच मगर समोर येत असल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. याबाबतची माहिती इम्रान मुजावर यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास दिली. माहिती मिळताच पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. हे दोघे सांगली नवीन पूल (शिवशंभो चौक ते सांगलीवाडी मार्ग) खाली नदीपात्रात अडकले होते. रेस्क्यू फोर्सच्या तत्परतेमुळे दोघांचीही सुटका झाली.