

ईश्वरपूर : कराड तालुक्यासह वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातील तब्बल १३,३६६ हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभदायक ठरणार्या कृष्णा कालव्याची सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी भाजपा-महायुती सरकारने १२५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या या निधीतून कृष्णा कालव्याची आवश्यक सुधारणा, बंदिस्तीकरण तसेच काँक्रीट लायनिंगची कामे करण्यात येणार आहेत.
कृष्णा कालव्याच्या दुरवस्थेचा प्रश्न आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून, त्यांनी कृष्णा कालव्याच्या समस्येकडे राज्याचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन कालव्याच्या सुधारणेसाठी २०० कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. तसेच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडेही त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.
विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात जलसंपदामंत्री विखे-पाटील यांच्या कराड दौर्यादरम्यान आमदार डॉ. भोसले यांनी त्यांच्यासमवेत कृष्णा कॅनॉलची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी कृष्णा कालव्याचे सिंचनाच्यादृष्टीने असलेले महत्त्व, त्यावर अवलंबून असलेली चार तालुक्यांतील शेती, पाण्याची गळती व शेतीचे नुकसान तसेच कालवा बंदिस्त करण्यासाठी व त्याच्या सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या निधीची सविस्तर माहिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
याची गांभीर्याने दखल घेत, जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ७५ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, तसेच १९३ पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी १५,००० कोटींच्या दीर्घ मुदतीच्या कर्जास मान्यता दिली आहे. या माध्यमातून सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे व वितरिकांच्या वितरण प्रणालीत सुधारणा करणे आदी कामांना निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत कृष्णा कालवा सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी मंजूर झालेला १२५ कोटींचा निधी कराडसह ४ तालुक्यातील सिंचन व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल या भागातील शेतकरी व नागरिकांमधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे सर्वस्तरातून आभार मानले जात आहेत.