Sangli Crime: अपहरण करून लावला गळफास

कोसारी दुहेरी खून-खटल्यातील साक्षीदाराचा सुपारी देऊन काढला काटा
Sangli Crime: अपहरण करून लावला गळफास
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : कोसारी (ता. जत) येथील दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दादासाहेब नामदेव यमगर (वय 50, रा. कोसारी) यांचा अपहरण करून कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यात नेऊन निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर हा खून आत्महत्या भासावी, यासाठी मृतदेह गळफास दिलेल्या अवस्थेत झाडाला लटकवण्यात आल्याची खळबळजनक माहिती तपासातून पुढे आली आहे.

या गुन्ह्याचा छडा कवठेमहांकाळ पोलिसांनी अवघ्या 12 तासात लावला. खूनप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून दोघे संशयित फरार आहेत. कोसारी दुहेरी खून-खटल्यातील संशयितांनी सुपारी देऊन दादासाहेब यमगर यांचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दादासाहेब यमगर हे ‌‘पेट्रोल भरून येतो‌’, असे सांगून गेले होते. त्यानंतर त्यांची दुचाकी (क्र. एमएच 13 एयू 6654) अज्ञात व्यक्ती घेऊन गेल्याचे समोर आले. त्यांचा मोबाईलही बंद असल्याने, नातेवाईकांनी अपहरणाची शंका व्यक्त केली.

दरम्यान, बुधवारी अथणी तालुक्यातील मदभावी परिसरात जमगी-हनमंतपूर रस्त्यालगत एका शेतामध्ये झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. अथणी पोलिसांनी ही माहिती दिल्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

दादासाहेब यमगर हे जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात असतानाच संशयितांनी त्यांचे अपहरण करून काटा काढला असावा, हा संशय बळावला. या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली. ज्ञानू खोत याने साथीदारांसह कट रचल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी सापळा रचून ज्ञानू खोत, रोहित पाटोळे आणि हर्षद पैलवान या तीन संशयितांना ताब्यात घेतले. दादासाहेब यांनी साक्ष देऊ नये, यासाठीच कट रचून हा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.

logo
Pudhari News
pudhari.news