

सांगली : सांगली-कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणीजवळ एका मद्यधुंद डॉक्टरच्या मोटारीने दुसऱ्या मोटारीला जोरदार धडक दिली. यानंतर मद्यधुंद डॉक्टरने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांंच्या ताब्यात दिले. परंतु या अपघाताबाबत कोणतीही तक्रार सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही.
कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणीनजीक एका मोटारीतून मद्यधुंद एक पुरुष व महिला डॉक्टर भरधाव वेगाने निघाले होते. ते शनिवारी रात्री आकाशवाणीजवळ आल्यानंतर डॉक्टरचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्यांच्या पुढील मोटारीला त्याच्या मोटारीने जोरदार धडक दिली. यात समोर असणाऱ्या मोटारीमधील कुटुंबातील कोणालाही दुखापत झाली नसल्याने ते कुटुंब बालंबाल बचावले. या अपघातानंतर दोन्ही डॉक्टरनी घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी त्यांना पकडून सांगली पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु त्यांच्याविरुद्ध कोणीही तक्रार दिली नसल्याने याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.