

सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील अतिक्रमणांवर काल सोमवारी चौथ्या दिवशीही जेसीबी चालवण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची 38 खोकी हटवण्यात आली. हॉटेल्सचे पार्किंग, खासगी कार्यालयांचे प्रवेशद्वार यासह सर्व अतिक्रमणे हटवल्याने कोल्हापूर रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला. दरम्यान, एसटी बसस्थानक व निवासस्थान परिसराची संरक्षक भिंत, होर्डिंग्ज व झाडेही काढून घेण्याची कार्यवाही होणार आहे, अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली.
कोल्हापूर रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे रुंदीकरणाचे काम रखडले होते. या रस्त्यावर झालेला अपघात आणि संघटनांनी केलेले आंदोलन यानंतर आयुक्त सत्यम गांधी यांनी रस्त्यावर उतरून पाहणी केली. रस्त्याची मोजणी करून हद्द निश्चितीबाबत सूचना दिल्या. अतिक्रमण काढून घेण्यासाठी संबंधितांना मुभाही दिली होती. हद्द निश्चितीनंतर अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई सुरू केली. उपायुक्त स्मृती पाटील, अतिक्रमणविरोधी विभागाचे अधीक्षक व सहायक आयुक्त नागार्जुन मद्रासी, सचिन सागावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चार दिवसात या रस्त्यावरील खोकी तसेच इतर अतिक्रमणे हटवली. अतिक्रमणे हटवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते रुंदीकरण कामास सुरुवातही झाली आहे.
बसस्थानक व कर्मचारी निवासस्थानाच्या संरक्षक भिंतीचे अतिक्रमण काढून घेण्याबाबत एसटी विभागीय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहितीही उपायुक्त पाटील यांनी दिली.
कुस्ती आखाडा परिसरातील 20, बसस्थानक परिसरातील 10 तसेच दोन्ही बाजूंची उर्वरित 8, अशी एकूण 38 खोकी हटवण्यात आली आहेत. शास्त्री चौक परिसरातील तीन खोक्यांबाबत उच्च न्यायालयाचे ‘जैसे थे’ आदेश आहेत. हा आदेश उठवावा व अतिक्रमण हटवण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि जिल्हा प्रशासन न्यायालयात धाव घेणार आहे. संस्थानच्या परवानगीने उभारलेल्या दोन खोक्यांबाबतही कार्यवाही होणार आहे. त्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे, अशी माहिती उपायुक्तस्मृती पाटील यांनी दिली.
उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या, कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी या मार्गातील 30 झाडे, चार मोठी होर्डिंग्ज, सीसीटीव्ही कॅमेर्यांची कमान काढावी लागणार आहे. रस्त्याच्या पश्चिम बाजूचे वडाचे झाड दोन-तीन फूट रस्त्यात येत आहे. मात्र हे झाड वाचविण्याचे प्रयत्न प्रशासनाचे आहेत. महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणांहून काढलेली 100 झाडे अन्यत्र रोपण (रिप्लँट) केलेली आहेत.