

बोरगाव : प्रस्तावीत शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बोरगाव (ता. वाळवा) येथील बसस्थानक परिसरात ईश्वरपूर-ताकारी रोडवर शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांसांब रांगा लागल्या होत्या.
या महामार्गात वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा काठावरील सुपीक जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. या शक्तिपीठ महामार्गाचा स्थानिक लोकांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. शिवाय हा मार्ग जमिनीपासून वीस ते पंचवीस फूट उंच असल्यामुळे या परिसरात सतत महापुराचाही धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे काही दिवसांपासून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला.
रविवारी सकाळी दहा वाजता बोरगाव येथील बसस्थानक परिसरात बाधित शेतकरी, ग्रामस्थ, महिला यांच्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना बाजूला करत वाहनांना मोकळी वाट करून दिली. यावेळी सरपंच जितेंद्र पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग सधन असणाऱ्या पट्ट्यातून नेऊन येथील शेतकऱ्यांना भूमिहीन करून बहुजन समाज उद्ध्वस्त करण्याचा उद्योग शासनाने चालवला आहे. हे सरकार शेतकरीविरोधी सरकार आहे.
जे. एस. पाटील म्हणाले, आपल्या भागाच्या झालेल्या विकासास अडथळा आणण्यासाठीच महामार्गाचा घाट घातला आहे. मसुचीवाडीचे माजी सरपंच सुहास कदम म्हणाले, हा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या घरादारावर पाणी फिरवणारा आहे. आंदोलनात तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, माजी अध्यक्ष रणधीर पाटील, हेमंत पाटील, सागर पाटील, विकास सूर्यवंशी, अमोल पाटील, संदीप पाटील, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, जयंती पाटील आदी उपस्थित होते.