

सांगली : येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील दुकानगाळे, खोकी काढून घेण्यासंदर्भात महापालिकेने बजावलेल्या नोटिसांविरोधात खोकीधारक संघटनेने बुधवारी महापालिकेसमोर खर्डा-भाकरी आंदोलन केले. या नोटिसा रद्द कराव्यात, अशी मागणी करत महासभेतील 2005 च्या ठरावाच्या प्रती पदाधिकारी, नगरसेवकांना दिल्या. दरम्यान, या नोटिसांवरून बुधवारी महासभेतही तीव्र पडसाद उमटले.
महानगरपालिका क्षेत्रातील अधिकृत खोकीधारकांवर कारवाई करू नये व 2005 साली पुनर्वसन रखडलेल्या खोकीधारकांचे तातडीने पुनर्वसन करावे, यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी केले. खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष गणेश कोडते तसेच दुकानगाळेधारक, खोकीधारक उपस्थित होते. महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी यांना गुलाब पुष्प देऊन आंदोलन केले. हारुण खतीब, सादिक बागवान, रेखा पाटील, शेखर मोहिते, अमरदीप गाडेकर, चंदू सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते. दरम्यान, मध्यवर्ती बस स्थानकासमोरील गाळेधारक, खोकीधारकांवरील कारवाईला तूर्त स्थगिती दिल्याची महासभेतील माहिती उपमहापौर गजानन मगदूम, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, गटनेत्यांनी आंदोलकांना दिली.