

सांगली : दहा दिवसांपूर्वी कवलापूर (ता. मिरज) येथे झालेल्या जबरी चोरीचा छडा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकला यश आले. याप्रकरणी अनिकेत अरुण मोहिते (वय 26) आणि राजेश संभाजी काटकर (वय 29, दोघे रा. कवलापूर, ता. मिरज) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख 46 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील प्रतीक दिनेश पवार यांना दि. 5 जानेवारीरोजी कवलापूर येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघांनी तात्पुरते बेशुद्ध करणारा स्प्रे फवारून लुटले. दोघांनी त्यांच्याकडील मोबाईल, रोकड आणि दुचाकी घेऊन पलायन केले होते. याबाबत पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तपास करीत होते.
दरम्यान, पथकातील अनिल कोळेकर आणि विक्रम खोत या दोघांना कवलापूर येथील जबरी चोरीतील दोघे संशयित सूतगिरणी चौक ते यशवंतनगर रस्त्यावर थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने छापा टाकून दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जबरी चोरीची कबुली दिली.