

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील सिद्धेश्वर यात्रेत एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. विश्वास कल्लाप्पा सुतार (वय 34, रा. कवलापूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित हल्लेखोर रोहित ऊर्फ नवनाथ श्रीरंग नाईक (वय 24, रा. कवलापूर, मूळ रा. भोसे, ता. मिरज) याला अटक केली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.
विश्वास हा कवलापूर-कुमठे फाटा रस्त्यावरील हॉटेलमध्ये वेटर होता. गावात सध्या सिद्धेश्वर यात्रा सुरू असल्याने तमाशा आयोजिला होता. यात्रेनिमित्त परिसरात मोठी गर्दी होती. गर्दीतून जाताना विश्वास आणि संशयित रोहित यांचा एकमेकांना धक्का लागला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाल्याने संतप्त झालेल्या रोहितने विश्वासला धक्का देऊन खाली पाडले आणि रस्त्यावरील दगड त्याच्या डोक्यात घातला.
विश्वासने आरडाओरडा केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन रोहितला पकडून ठेवले. गंभीर जखमी विश्वासला रुग्णवाहिकेतून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सूरज भूपाल सुतार याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपअधीक्षक संदीप भागवत, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर, सहायक निरीक्षक कल्याणी शिंदे आणि ईस्माईल तांबोळी यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
नियमांचे उल्लंघन...अनर्थाला निमंत्रण
प्रशासनाकडून जाहीर कार्यक्रमांना रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी दिली जाते. मात्र, कवलापूर येथील यात्रेत स्थानिक संयोजकांनी नियमांचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू ठेवले होते. याकडे पोलिसांनीही दुर्लक्ष केल्याने मध्यरात्रीपर्यंत यात्रेत मोठी वर्दळ होती. जर नियमांचे काटेकोर पालन झाले असते, तर कदाचित ही खुनाची घटना टळली असती, अशी चर्चा परिसरातील ग्रामस्थांमध्ये आहे.