

सांगली : कवठेमहांकाळ येथील मतिमंद व मूकबधिर मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अर्जुन सर्जेराव लोखंडे (वय २५, रा. थबडेवाडी रस्ता, एमएसईबीजवळ, कवठेमहांकाळ) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी दोषी ठरवत जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, २०२१ मध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी घरात एकटी असताना अर्जुन लोखंडे याने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पीडितेची आई शेतातून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी अर्जुनला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अक्षयकुमार ठिकणे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी आई, संशयितास रंगेहाथ पकडणारे ग्रामस्थ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
एका निरपराध व अपंग मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन संशयित लोखंडे याने गंभीर गुन्हा केला असल्याने त्याच्यावर कोणतीही दया दाखवू नये, असा युक्तिवाद ॲड. कुलकर्णी यांनी केला. सर्व पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश मोहंती यांनी लोखंडे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या खटल्यात पोलिस उपनिरीक्षक ठिकणे, पोलिस कर्मचारी नितीन गायकवाड, पैरवी कक्षातील रेखा खोत, वैभव काळे, वंदना मिसाळ, सुनीता आवळे, सहायक पोलिस निरीक्षक मुदस्सर शेख आणि उपनिरीक्षक शब्बीर परीट यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.