

मिरज : कवलापूर येथे विमानतळ करण्यासंदर्भात शासनाची टीम लवकरच पाहणी करणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी मिरजेत पत्रकारांना दिली. बारामतीसारख्या अनियंत्रित एअर स्ट्रीप देशात आणखी किती आहेत? याची सुद्धा चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ करण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारमार्फत जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कवलापूर विमानतळाबाबत राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. हा प्रस्ताव प्राप्त होताच केंद्र सरकारची एक टीम पाहणी करण्यासाठी कवलापूरमध्ये लवकरच येईल. कवलापूर विमानतळ लवकर व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहोत. विमानतळासाठी राज्य सरकारने जागा द्यावी लागते. भूसंपादनाच्यादृष्टीने जिल्हाधिकारी स्तरावरून हालचाली सुरू आहेत, असे मंत्री मोहोळ यांनी सांगितले.
बारामतीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास सुरू आहे. दुर्घटनेबद्दल कोण काय बोलत आहे, याला महत्त्व नाही. विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून डाटा डाऊनलोड करणे सुरू आहे. डीजीसीआयकडून अजून अहवाल आलेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर विमान दुर्घटनेचे कारण स्पष्ट होईल. बारामतीमध्ये जी एअर स्ट्रीप आहे, ती एका फ्लाईंग क्लबच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची आहे. देशात अशा अनियंत्रित एअर स्ट्रीप किती आहेत, यासंदर्भातील माहिती डीजीसीआयकडून घेतली जात आहे. दुर्घटना घडू नयेत, यासाठी दक्षता घेतली जात आहे, असे राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले. सांगली ‘ड’ वर्ग महापालिका आहे. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असे राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले. महापौर धीरज सूर्यवंशी उपस्थित होते.
अहमदाबाद विमान दुर्घटनेचा अंतिम अहवाल बाकी
अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत अंतिम अहवाल यायचा आहे. आपली यंत्रणा या अपघाताचा तपास करत आहे. बाहेरच्या यंत्रणांचा अहवाल काय आहे, यापेक्षा आपल्या देशाच्या यंत्रणेचा अहवाल महत्त्वाचा आहे. बाहेरच्या यंत्रणेपेक्षा आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायला पाहिजे, असे केेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.