

सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये रिक्त झालेल्या थेट सरपंच आणि सदस्यांच्या रिक्त जागांसाठी आज, मंगळवारी (दि. 28) पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यातील 18 रिक्त थेट सरपंच पदांसाठी तसेच 82 रिक्त सदस्य पदांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी काही जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित जागांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होत आहे. मतदानासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
पोटनिवडणुकीसाठी रविवारी प्रचाराची सांगता झाली आहे. उमेदवारांकडून शेवटच्या रात्री गुप्त प्रचाराला गती देण्यात आली. पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सर्वच उमेदवार व कार्यकर्ते प्रयत्न करीत होते.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. संबंधित गावांतील मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे घेऊन अधिकारी, कर्मचारी सोमवारी दुपारीच पोहोचले. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची तयारी सुरू होती. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.