सांगली : कर्नाळमध्ये जमिनीच्या वादातून युवकाचा खून

दोन दिवसापूर्वी कोयत्याने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू; चारजणांना अटक, अल्पवयीन मुलगा ताब्यात
Sangli News
कर्नाळमध्ये जमिनीच्या वादातून युवकाचा खून
Published on
Updated on

सांगली ः शेतजमिनीच्या वादातून चुलत भावावर कोयत्याने हल्ला करून बेदम मारहाण करण्यात आली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना मिरज तालुक्यातील कर्नाळ येथे दि. 18 रोजी दुपारी चार वाजता घडली. सत्यजित विकास कांबळे (वय 22, रा. कर्नाळ) असे मृत युवकाचे नाव आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून चारजणांना अटक केली आहे. यात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.

अटक केलेल्यात शुभम शैलेश कांबळे (24), सोमेश शैलेश कांबळे (19), स्वराज ऊर्फ कुणाल बाळासाहेब कांबळे (21, सर्व रा. कर्नाळ) आणि हणमंत दिगंबर गायकवाड (18 वर्षे पूर्ण, रा. समर्थ कॉलनी, सांगली) या चौघांचा समावेश आहे. पोलिसांनी बारा तासात संशयितांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी विकास कांबळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, सत्यजित कांबळे हा कुटुंबीयांसह कर्नाळ येथे राहत होता. मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तो डिग्रज रस्त्यावरील शेतामध्ये खांब लावण्यासाठी गेला होता. यावेळी संशयित पाचजण कोयता, काठी घेऊन शेतात आले. शेतामध्ये खांब लावण्याच्या कारणावरून संशयितांनी त्याच्याशी वाद घातला. खांब का लावत आहेस, असे म्हणत संशयित शुभम याने कोयत्याने सत्यजितवर हल्ला केला. त्याच्या डोक्यात दोन वार करून, आता तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून पुन्हा हल्ला केला. याचवेळी संशयित स्वराज कांबळे याने त्याला काठीने हात, पाय, पाठीवर मारले. यावेळी प्रवण हा जखमी सत्यजितला वाचविण्यासाठी गेला असता, त्याला सोमेश, स्वराज यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. सत्यजित याचे वडील फिर्यादी विकास कांबळे व इतर नातेवाईक भांडणे सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही दगडाने मारून घटनास्थळावरून पलायन केले. नातेवाईकांनी तातडीने सत्यजित याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेे होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्याचा काल, गुरुवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी विकास कांबळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनीहल्ल्यासह खुनाचाही गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर विभागाच्या उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.

ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांच्या पथकाने हल्लेखोरांना जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली. पथकाने कर्नाळ ते बुधगाव रस्त्यावरील रेल्वे पुलानजीक लपून बसलेल्या संशयित शुभम कांबळे आणि सोमेश कांबळे यांना जेरबंद केले, तर बसस्थानक परिसरातून संशयित कुणाल कांबळे, हणमंत गायकवाड यांना अटक करण्यात आली. पोलिस चौकशीत चौघाही संशयितांनी जमीन हद्द वादातून कोयता आणि काठीने हल्ला केल्याची कबुली दिली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. तसेच अल्पवयीन युवकास ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक किरण चौगले, सहायक निरीक्षक श्रीमती शिंदे, उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, कर्मचारी मेघराज रूपनर, नितीन पाटील, महेश जाधव, मनोज निळकंठ, बंडू पवार, अभिजित पाटील, रणजित घार्गे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news