Sangli Crime : कामेरीतील घरफोड्यांचा छडा; टोळीचा म्होरक्या जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण, ईश्वरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई; १० लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
Sangli Crime news
Sangli Crime news
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील कामेरी येथे एकाच रात्री तब्बल ५ बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवणाऱ्या अट्टल घरफोड्या टोळीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ईश्वरपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने गजाआड केले आहे. प्रवीण राजा शिंदे (वय ३५, रा. गणेशवाडी रोड, वडूज, ता. खटाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित मुख्य सूत्रधाराचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १० लाख ६७ हजार ५५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेल्या लोखंडी कटावण्या हस्तगत केल्या. या गुन्ह्यात त्याचे साथीदार आर्यन कान्हा काळे आणि अजय लायन्या शिंदे (दोघे रा. फडतरवाडी, ता. खटाव, जि. सातारा) हे दोघेही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून, ते सध्या फरार आहेत.

११ सप्टेंबर २०२६ रोजीच्या मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी कामेरी येथील संतोष खाशेराव परीट, बाबू नानाभाऊ आंधळे, विजय बाजीराव पाटील, उज्ज्वला गजानन जाधव आणि सारिका राजेंद्र सोनावले या ५ जणांच्या घरांचे दरवाजे व लाकडी कपाटांचे कडी-कोयंडे उचकटून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेची चोरी केली होती.

पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, ईश्वरपूरचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह विशेष पथके तयार करण्यात आली होती. दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांचे पथक ईश्वरपूर व तासगाव परिसरात गस्त घालत असताना, पाचवा मैल परिसरात एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रवीण शिंदे याला ताब्यात घेतले.

१५ गंभीर गुन्हे

अटक करण्यात आलेला मुख्य संशयित प्रवीण शिंदे हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी सातारा व सांगली जिल्ह्यांत दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याला १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे करत आहेत. फरार असलेल्या त्याच्या दोन्ही साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news