

सांगली : कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायतीची केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व लोक तक्रार विभागाकडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय 'सुवर्ण पुरस्कारासाठी' निवड झाली आहे. कडेपूर ग्रामपंचायतीने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कडेपूर ग्रामपंचायतीने नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केला. ग्रामपंचायतीने स्वतःची अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल ॲप विकसित करून जन्म-मृत्यू दाखले, घरपट्टी व पाणीपट्टी भरणा, ऑनलाइन तक्रार निवारण, विविध योजनांची माहिती तसेच अर्ज प्रक्रिया नागरिकांसाठी घरबसल्या उपलब्ध करून दिली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा दर्जा उंचावला आहे. गटविकास अधिकारी राऊत, विस्तार अधिकारी श्रीधर कुलकर्णी, सुनील लोहार, सरपंच सतीश देशमुख यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. दरम्यान, पुरस्कार वितरण सोहळा जयपूर येथे होणार असून त्यामध्ये कडेपूर ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.