Sangli Sugarcane Transport Blocked : बावची फाट्यावर हुतात्माची ऊस वाहतूक रोखली

स्वाभिमानीचे आंदोलन; प्रतिटन ५,५०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी
Sangli Sugarcane Transport Blocked : बावची फाट्यावर हुतात्माची ऊस वाहतूक रोखली
Published on: 
Updated on: 

आष्टा : चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. बावची फाटा (ता. वाळवा) परिसरात पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिटन पाच हजार पाचशे रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वाढती महागाई, खते, औषधे, मजुरी आणि वाहतुकीचा वाढता खर्च यामुळे ऊस उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून प्रतिटन ५,५०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

ऊस दराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत ऊस वाहतूक रोखून कारखाना व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यात आले. प्रश्न लवकरात लवकर न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष विश्वास कोळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, बाबासाहेब सांद्रे, संतोष शेळके, सचिन यादव, काशिनाथ निंबाळकर, दत्ताजी जाधव, अरुण कवठेकर, शामराव जाधव, बबलू जमादार यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news