

रजाअली पिरजादे
कडेगाव शहर : निसर्गाच्या बदलत्या हवामानाचा मोठा फटका चालू वर्षी शेती पिकांना बसला आहे. खरीप हंगामात ऊस, मका, ज्वारी आणि भात यांसारख्या पिकांवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. जमिनीतून बाहेर पडून ही कीड रात्रीच्या वेळी पाने व मुळाजवळील खोड कुरतडते. यामुळे पिकांची वाढ खुंटून ती वाळू लागली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कडेगाव तालुक्याचे एकूण ५८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यात पारंपरिक ऊस पिकाचे २२ हजार, तर खरीप हंगामाचे जवळपास १६ हजार हेक्टर क्षेत्र येते. सध्या या संपूर्ण परिसरातील आडसाली, पूर्वहंगामी व खोडवा ऊस पिकांवर हुमणीचा प्रादुर्भाव जास्त आहे. हुमणी कीड नियंत्रण ही सामूहिक जबाबदारी असून, परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रितपणे उपाययोजना केल्यास या किडीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होईल.