

सांगली : पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी जाणीवपूर्वक केली जात नाही. पत्रकार सन्मान निधीचा लाभ आतापर्यंत केवळ १२४ पत्रकारांनाच मिळाला आहे. राज्यातील सुमारे ३० हजार पत्रकारांपैकी केवळ तीन हजार पत्रकारांकडेच अधिस्वीकृती आहे. सरकार पत्रकारांना संरक्षण, पेन्शन आणि आरोग्य योजना देत असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षातील वास्तव वेगळे आहे, अशी टीका अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली.
सांगलीत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनातर्फे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, अनिल सिंग, मधू नैनन, नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर, माजी अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सन्मान निधीची व्याप्ती अत्यंत मर्यादित आहे. अधिस्वीकृती मिळवितानाही पत्रकारांची अडवणूक केली जाते. आरोग्य योजना अधिस्वीकृतीशी जोडण्यात आली आहे. सरकारने पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे व व्यापक स्वरूपात काम करण्याची गरज आहे. मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनीही मार्गदर्शन केले.
शिवराज काटकर यांचा विशेष सत्कार
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवराज काटकर यांची निवड झाली. सांगली जिल्ह्याला प्रथमच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाल्याने यावेळी मान्यवरांच्याहस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रवीण शिंदे जिल्हाध्यक्ष
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रवीण शिंदे, तर कार्याध्यक्षपदी तुकाराम धायगुडे यांची निवड झाली. डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन राजमाने, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेटकरी, कार्याध्यक्षपदी प्रकाश सूर्यवंशी, तर हल्लाविरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव आणि कार्याध्यक्षपदी शैलेश पेटकर यांची निवड झाली. तसेच विकास सूर्यवंशी, तानाजी जाधव, कुलदीप देवकुळे, संजय माळी आणि अविनाश कोळी यांची राज्य कार्यकारिणीवर निवड झाली.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. डिजिटल माध्यमांसाठीचे कायदेशीर ज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. शिवाजी जाधव यांनी बातमी लिहिताना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच पत्रकारिता जबाबदारीने करण्याचा सल्ला दिला. ज्येष्ठ पत्रकार विवेक वाघमोडे यांनी ‘फेक न्यूज कशी ओळखावी’ या विषयावर व्हिडीओ सादरीकरणातून मार्गदर्शन केले.