Sangli job fraud: रेल्वे, आरोग्य खात्यात नोकरीचे आमिष दाखवून पाचजणांना ६० लाखांचा गंडा

बनावट शिक्के, नियुक्तीपत्रांद्वारे फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल
Job Fraud
Job FraudPudhari
Published on
Updated on

कुपवाड : रेल्वे आणि आरोग्य खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट शिक्के व कागदपत्रांच्या आधारे पाच जणांची ५९ लाख ८३ हजार २५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी जयकुमार बाबासाहेब नरदेकर (वय ४८, रा. कवठेकर गल्ली, कुपवाड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुपवाड पोलिस ठाण्यात अमोल ज्ञानोबा ढोबळे (रा. अवधूत कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, कुपवाड) आणि बीजनदास (मूळ रा. कोलकाता) या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयकुमार नरदेकर यांचा मुलगा सूरज नरदेकर याच्यासह त्यांच्या ओळखीचे दत्तात्रय प्रल्हाद चोरमुले, लक्ष्मण सटवा शिंदे, एकनाथ सायराप्पा हुबाले आणि शाम अशोक भाट यांच्या मुलांना शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष संशयित अमोल ढोबळे व बीजनदास यांनी दाखवले होते. मुलांना रेल्वे आणि आरोग्य खात्यात निश्चित नोकरी लावतो, असे खोटे आश्वासन देऊन या दोघांनी पालकांचा विश्वास संपादन केला. या विश्वासाचा गैरफायदा घेत संशयितांनी ३० ऑक्टोबर २०२४ ते २१ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत या पाचही जणांकडून वेळोवेळी एकूण ५९ लाख ८३ हजार २५० रुपये उकळले.

पैसे घेतल्यानंतर संशयित ढोबळे आणि बीजनदास यांनी मुलांना रेल्वे व आरोग्य खात्यात भरती केल्याचे भासवणारे बनावट शिक्के आणि खोटे दस्तावेज दिले. तसेच लवकरच अधिकृत नियुक्तीपत्रे मिळतील, असे सांगून त्यांची फसवणूक करत राहिले. नोकरी न मिळाल्याने आणि दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे नरदेकर व इतरांच्या निदर्शनास आले. यानंतर नरदेकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news