Sangli Fire News : झरे येथे प्लंबिंग साहित्याच्या दुकानास लावली आग

तिघा अज्ञातांचे कृत्य; आटपाडी पोलिसात गुन्हा
Fire News
Fire News Canva Image
Published on
Updated on

आटपाडी : झरे (ता. आटपाडी) येथील झरे-दिघंची रस्त्यावरील 'सुवर्ण भारत प्लंबिंग अँड ट्रेडर्स' या दुकानाला अज्ञात तिघांनी आग लावली. घडली. ११ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेत दुकानातील प्लंबिंग, इरिगेशन, ठिबक व सेनेटरी साहित्यासह फर्निचर जळून खाक झाले. दुकानासमोर उभी असलेली दुचाकीही या आगीत खाक झाली असून, सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद पोलिसांत दाखल झाली आहे.

याबाबत भारत ज्ञानदेव पडळकर (वय ४६, रा. पडळकरवाडी, ता. आटपाडी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पडळकर यांचे झरे-दिघंची रस्त्यावरील जमीन गट क्रमांक ५० मधील जागेत प्लंबिंग व इरिगेशन साहित्याचे दुकान आहे. ११ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात तीन व्यक्तींनी दुकानाला आग लावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

आगीत प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्या, इरिगेशन व ठिबक सिंचनाचे साहित्य, रेनपाईप, गार्डनपाईप, सेनेटरी साहित्य आणि फर्निचर जळून मोठे नुकसान झाले. तसेच दुकानाबाहेर उभी असलेली दुचाकी (क्र. एमएच ११ सीए ७२७२) आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानाला आग नेमकी कोणत्या कारणातून लावली आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही व इतर पुराव्यांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news