Sangli : जतपूर्व भागात पिके पाण्यात

जनजीवन विस्कळीत ः शेतकरी आर्थिक संकटात ः भरीव आर्थिक मदतीची मागणी
Sangli News
जतपूर्व भागात पिके पाण्यात
Published on
Updated on

विजय रूपनूर

जत : घरात गुडघाभर पाणी आहे, छत गळतंय, दारात जनावरे पावसामुळे कुडकडत आहेत, शेतात पाय ठेवायला जागा नाही, हाता-तोंडाला आलेला घास पावसाने हिरावून घेतला, अशी भावना व्यक्त होत आहे. जतपूर्व भागातील शेतकरी आणि सामान्य लोकांतून. मका, बाजरी, तूर, उडीद, भुईमूग, सूर्यफूल आदी पिके, तर डाळिंब, द्राक्षे, पेरू या फळबागांची वाताहत झाली आहे. उसात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे.

माडग्याळ, तिकोंडी, उमदी, सोनलगी, बोर्गी बुद्रुक, संख, बोर्गी खुर्द, हळ्ळी, बालगाव, माणिकनाळ, अक्कळवाडी, उमदी, सुसलाद, सोनलगी, बालगाव, अंकलगी, करजगी, गिरगाव, जालीहाळ, भिवर्गी, जा. बोबलाद, लाकडेवाडी, कुलाळवाडी, गुड्डापूरसह बोर नदीपात्र परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे, घरांचे नुकसान झाले. अनेक रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत. द्राक्षांच्या बागात गुडघाभर पाणी साचले आहे. सुपीक जमीन वाहून गेली आहे. सगळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त व बाधित पिकांची पाहणी केली. महसूल व कृषी विभागाच्यावतीने पंचनामे सुरू केले आहेत. मदत कधी मिळेल, किती मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

दोनशे घरांची पडझड

अक्कळवाडी, मोरबगी, हळ्ळी येथील सुमारे दोनशे घरांची पडझड झाली आहे. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. परिणामी संसार उघड्यावर आले आहेत.

ओव्हर फ्लोमुळे बोर्गीत पाणी शिरले

बोर्गी व अक्कळवाडी रस्त्यानजीकचे लहान तलाव ओव्हरफ्लो झाल्याने बोर्गी गावात पाणी शिरले आहे. दरम्यान, बालगाव येथील द्राक्षबागेत पाणी शिरले आहे. त्यामुळे द्राक्षबागांच्या काड्या कुजण्याचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news