

जत शहर : जत तालुक्यातील कोळगिरी गावात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गावातील परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, पाणी भरण्यासाठी नागरिकांना आधीच भांडी लावून रांगा लावाव्या लागत आहेत.
कोळगिरी गावातील बोअरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे ते पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत टाकून त्याद्वारे सार्वजनिक नळांमधून पुरवठा केला जातो. मात्र हा पाणीपुरवठा एक दिवसाआडच केला जातो आणि तोही केवळ तासभरासाठीच उपलब्ध असतो. गावात सुमारे आठ ते दहा सार्वजनिक नळ पॉईंट आहेत. सुमारे 2500 लोकसंख्येच्या तुलनेत ही व्यवस्था अपुरी ठरत असल्याने पाणी भरण्यासाठी नागरिकांना आधीच भांडी ठेवून नंबर लावावे लागत आहेत. काहीवेळा सर्वांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
पाण्याअभावी महिलांवर आणि कुटुंबांवर मोठा ताण पडत असून दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नियमित व मुबलक पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.