

जत : तालुक्यातील सनमडी, मायथळ, कुणीकोणूर, आबाचीवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून गेले. पत्रे, कौले, गवती छप्पर, जनावरांचे गोठे तसेच झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आबाचीवाडी येथे रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी विद्युत खांबही कोसळले आहेत. ज्वारीचे कडवळ जमीनदोस्त झाले आहे.
कुणीकोणूर येथील ग्रामपंचायत इमारतीवरील कौले उडून गेली आहेत. तसेच राजश्री नंदकुमार चव्हाण (वय 32) यांच्या अंगावर कौले पडल्याने त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर माडग्याळ येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. वादळी वाऱ्यामुळे कुणीकोणूर येथील रावसाहेब तुकाराम पाटील, तानाजी कृष्णदेव पाटील, राजेंद्र जयवंत सुतार, नंदकुमार विठोबा चव्हाण, राजू रामा करे, धनेश्वर बापू करे, धूळा पांडुरंग खांडेकर, पांडुरंग खेमा चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
आबाचीवाडी येथील दासू काशीनाथ कोळेकर, भानुदास रुपनूर, शिवाजी रुपनूर, म्हाकू मोटे, दिनकर रुपनूर, बाळू रुपनूर, सुभाष खर्जे, बापू धायगुडे, स्वप्निल सकट यांच्या घरांचे छत उडून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भागात 60 पेक्षा अधिक घरांची पडझड झाली असून, तानाजी खर्जे यांची जर्सी गाय जखमी झाली आहे. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुले भीतीने किंकाळत असल्याचे चित्र दिसून आले. रस्त्यावर झाडे पडल्याने अनेक मार्ग वाहतुकीस बंद झाले आहेत. दरम्यान, मायथळ येथील पांडूरंग भंडे, बबन कोळी, श्रीकांत पाटील, बाबासाहेब भंडे, विलास पाटील, बिरप्पा कळगुंडे यांच्या घरांवरील पत्रे व कौले उडून गेली आहेत. तसेच सनमडी येथील अनेक घरांवरील पत्रेही उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्तांनी संपर्क साधावा
तहसीलदार प्रवीण धानोरकर म्हणाले, गुरुवारपासून ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवकांकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी तातडीने महसूल विभागाला माहिती द्यावी.