Sangli News : जत तालुक्यात चाराटंचाई; कडब्यावर भिस्त

पशुपालक चिंतेत; चारा डेपो सुरू करण्याची मागणी
Sangli News
जत तालुक्यात चाराटंचाई; कडब्यावर भिस्त
Published on
Updated on

जत : पावसाने ओढ दिल्याने जत तालुक्यात खरीप पिकांबरोबरच पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. हिरवा चारा संपला असून, शेतातील सुका चारा आणि कडबाही अपुरा पडत असल्याने पशुपालकांना विकतचा चारा घेण्याची वेळ आली आहे. मात्र, चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील माडग्याळ, व्हसपेठ, सोन्याळ, दरीबडची व परिसरात चारा टंचाईची तीव्रता अधिक जाणवत आहे. सध्या मुरघासाचा दर १० ते १२ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. मका पेंढी सुमारे १५ ते २० रुपये, तर ज्वारीची पेंढी ३० ते ४० रुपये दराने विकली जात आहे. जनावरांसाठी चारा म्हणून वापरल्या जाणाऱ्या उसाचा दरही ३००० ते ४००० रुपये प्रतिटनापर्यंत पोहोचला आहे.

व्हसपेठ येथील मुरघास मशीनधारक संभाजी लेंगरे म्हणाले, जत तालुक्याच्या पूर्व भागात मुरघासासाठी मक्याचे प्लॉट उपलब्ध होत नाहीत. उपलब्ध असलेल्या प्लॉटचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे मुरघास तयार करण्याचा खर्च वाढला आहे. पूर्वी ७ ते ८ रुपये किलो मिळणारा मुरघास आता १० ते १२ रुपये किलोने विकावा लागत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने आमच्यासह शेतकरीही अडचणीत आहेत

दुग्ध व्यवसायाचे गणित बिघडले

चाऱ्याचे दर वाढल्याने जनावरांच्या संगोपनाचा दैनंदिन खर्च वाढला आहे. एका जनावराच्या चाऱ्यावर दररोज २५० ते ३०० रुपयांपेक्षा अधिक खर्च होत असल्याने दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न आणि चाऱ्याचा खर्च यांचे गणित बिघडले आहे.

चारा डेपो सुरू करण्याची मागणी

शेतकरी सीताराम माळी यांनी माडग्याळ व परिसरात तातडीने शासकीय चारा छावणी अथवा अनुदानित चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news