

जत : आमदार गोपीचंद पडळकर मागणार आणि मी देणार, हा आमचा अलिखित नियमच आहे, असे सांगत जत तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी चालू आर्थिक वर्षात 75 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. तसेच देवभूमी जत या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जत पंचायत समितीच्या 15 कोटी रुपये खर्चाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात शनिवारी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सदाभाऊ खोत होते. यावेळी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, सभापती अर्चना पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, जत तालुक्याला गेल्या 61 वर्षांत पंचायत समितीची स्वतःची इमारत नव्हती. मात्र गोपीचंद पडळकर यांनी आमदार होताच ही मागणी लावून धरली. तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून गावपातळीवरील कामांना गती देण्यात येत आहे. तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेंतर्गत तालुक्यातील नऊ धार्मिक स्थळांसाठी प्रत्येकी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात जत तालुक्यातील सुमारे 890 किलोमीटर ग्रामीण रस्त्यांच्या मजबुतीकरणाची आवश्यकता मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर मंत्री गोरे यांनी 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली.
आमदार पडळकर म्हणाले, तब्बल एकसष्ठ वर्षांनंतर जत तालुक्यासाठी ही आधुनिक प्रशासकीय इमारत साकारत आहे. गेल्या दोन वर्षांत म्हैसाळ विस्तार योजनेला गती दिली असून डिसेंबरपर्यंत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचे नियोजन आहे. जत शहरासाठी 79 कोटींची पाणी योजना 70 टक्के पूर्ण झाली असून क्रीडा नगरी, प्राणी संग्रहालय आणि घरकुल योजनांच्या माध्यमातून विकासकामांना वेग दिला आहे. अध्यक्षीय भाषणात सदाभाऊ खोत म्हणाले, आमदार पडळकर हे दुष्काळी भागासाठी संघर्ष करणारे नेतृत्व आहे. गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांनी प्रास्ताविक केले.