

जत : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सांगली पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार रोहित विष्णू हिप्परकर आणि त्याच्या टोळीतील चारजणांना सांगली व सोलापूर या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले.
तडिपार करण्यात आलेल्यांमध्ये रोहित विष्णू हिप्परकर (वय 21), सार्थक तानाजी हिप्परकर (24), अक्षय ऊर्फ खंडू बाबासाहेब हिप्परकर (22), मंगेश ऊर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर (28, सर्व रा. सिंगनहळ्ळी, ता. जत) यांचा समावेश आहे. या टोळीवर सन 2024 आणि 2025 या कालावधीत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये प्रामुख्याने गुन्ह्याचा कट रचून अपहरण करणे व खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्रांनी गंभीर दुखापत करणे, जिवे मारण्याची धमकी देणे आणि जबरीने मालमत्ता हडपण्यासाठी मारहाण करणे, जिल्हादंडाधिकारी यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
या गुन्हेगारांकडून वारंवार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, जत पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 अन्वये तडिपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. दाखल गुन्हे आणि प्रतिबंधक कारवायांचा विचार करून, नैसर्गिक न्यायतत्त्वांचे पालन करत ही दोन वर्षांची तडिपारी लागू करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जतचे उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले, निरीक्षक संजीव झाडे, संदीप कोळेकर व त्यांच्या पथकाने केली. जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आगामी काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.