Sangli Crime : जतमध्ये इलेक्ट्रिकल्स दुकानात ८ लाखांची चोरी

तपासाची दिशाभूल करण्यासाठी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही लांबवला
Shop Burglary
जतमध्ये इलेक्ट्रिकल्स दुकानात ८ लाखांची चोरी
Published on
Updated on

जत : जत शहरातील वळसंग रोडवरील श्री विनायक इलेक्ट्रिकल्स या दुकानात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या चोरीत आठ लाखांहून अधिक किमतीचे कॉपर वायर व अन्य इलेक्ट्रिकल साहित्य चोरट्यांनी लंपास केले. चोरीचा तपास भरकटवण्यासाठी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही चोरून नेल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

संजय मोरडी यांच्या मालकीच्या या दुकानात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील सुमारे ३९० किलो कॉपर वायर, ३२० किलो स्क्रॅप वायर तसेच इतर इलेक्ट्रिकल साहित्य चोरून नेले. चोरी झालेल्या साहित्याची एकूण किंमत आठ लाख रुपयांहून अधिक आहे. चोरीदरम्यान चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीच्या वायर कापून टाकल्या आणि चित्रण रेकॉर्ड होऊ नये, म्हणून डीव्हीआरही सोबत नेला. मात्र, शेजारील दुसऱ्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित चोरटे दिसून आले असून, या फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

एकाच दुकानात पाचव्यांदा चोरी

विनायक इलेक्ट्रिकल्स या दुकानात चोरी होण्याची ही पाचवी घटना आहे. गेल्या १६ वर्षांत या दुकानात वारंवार चोरी झाली आहे. २०१० मध्ये तीन वेळा, २०१२ मध्ये एक वेळा आणि आता पुन्हा एकदा चोरट्यांनी हे दुकान फोडले. दुकानाचे मालक संजय मोरडी यांनी अनेक वेळा दुकानाची जागा बदलली, तरीही चोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे या चोऱ्यांमागील टोळीचा शोध घेणे आणि चोरट्यांना जेरबंद करणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news