Jat Bribery case: जतमध्ये कॉन्स्टेबल, पोलिसपाटील ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १ लाख ६० हजारांची मागणी
Bribery Case
Bribery Case(Pudhari Photo)
Published on
Updated on

जत : चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १ लाख ६० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जत पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल विक्रम विठ्ठल घोदे (वय ४०) आणि सिद्धनाथ (ता. जत) येथील पोलिसपाटील काशीराम कृष्णा माने (३६) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही अटक केली आहे.

याप्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक योगेश रमेश चव्हाण यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराच्या नातेवाईकांवर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल विक्रम घोदे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला २ लाख रुपयांची लाच मागितली होती. अखेर तडजोडीअंती १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम निश्चित झाली. ही लाचेची रक्कम सिद्धनाथ गावचे पोलिसपाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. तसेच, माने याने लाच देण्यासाठी प्रोत्साहन देत तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्‍न झाले आहे.

त्यानंतर कॉन्स्टेबल घोदे याला जत येथील पोलिस वसाहतमधील शासकीय निवासस्थानातून सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसपाटील काशीराम माने यालाही सिद्धनाथ (ता. जत) येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक यास्मिन इनामदार तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news