

जत : तालुक्यातील भिवर्गी येथे दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. महादेव सिद्धू बिरादार (रा. भिवर्गी) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव बिरादार आणि शीलसिद्धा बिरादार या दोघांनीही दुपारी दारू प्राशन केली होती. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी महादेव यांना हाताने आणि चप्पलने बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत महादेव यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर महादेव यांना तातडीने जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेने भिवर्गी परिसरात खळबळ उडाली असून, सहायक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.