

पलूस : पलूस तालुक्यातील बांबवडे (येळावी फाटा, सुर्वे मळा) परिसरात शेळीपालन शेडमधून अज्ञात चोरट्यांनी 16 शेळ्या-बोकडांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. एकूण अंदाजे 1 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी पलूस पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत रशिद बाबुभाई फकिर (वय 50, व्यवसाय शेती, मूळ रा. ईश्वरपूर, ता. वाळवा, सध्या रा. बांबवडे, ता. पलूस, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.30 वाजल्यापासून ते दि. 1 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान, सुर्वे मळा येथील अविनाश यशवंत गायकवाड यांच्या शेतात असलेल्या फिर्यादीच्या शेळीपालन शेडमध्ये पाठीमागून प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. चोरीस गेलेल्या मालामध्ये भोर जातीचा 1 बोकड (7-8 महिने) किंमत 5,000 रुपये, राजस्थानी जातीचा 1 बोकड (1 वर्ष) किंमत 8,000 रुपये, काटेवाडी जातीच्या 5 शेळ्या (2-3 वर्षे) किंमत 50,000 रुपये, देशी 5 शेळ्या (1 वर्ष) किंमत 50,000 रुपये तसेच देशी 4 बोकड (2 महिने) किंमत 2,500 रुपये असा एकूण 16 जनावरांचा समावेश आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल अद्याप हस्तगत झालेला नाही. घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.