

जत : कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय शैक्षणिक पात्रता किंवा आवश्यक नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका स्टाफ नर्सविरुद्ध उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालीहाळ बुद्रुक (ता. जत) येथील हनुमान मंदिराजवळील भाड्याच्या गाळ्यात हा बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आले.
गणपती महादेव जाधव (वय २९, रा. जालीहाळ बुद्रुक) असे संशयिताचे नाव आहे. संशयित जाधव हा कर्नाटकात विजयपूर येथील बसव हॉस्पिटलमध्ये 'स्टाफ नर्स' म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिस नोंदीत समोर आली आहे. याप्रकरणी उमदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता जयवंत तळेकर (वय २८) यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती जाधव याने जालीहाळ बुद्रुक येथील हनुमान मंदिराजवळ भाड्याच्या गाळ्यात विविध प्रकारची औषधे, गोळ्या, इंजेक्शन्स आणि वैद्यकीय उपकरणांचा साठा करून दवाखाना थाटला होता. वैद्यकीय उपचारांची कोणतीही अधिकृत पदवी अथवा वैद्यकीय परिषदेची नोंदणी नसताना तो रुग्णांवर उपचार करत होता.
छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून उपचारासाठी लागणारी औषधे, इंजेक्शन्स, वैद्यकीय साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ४४ हजार १३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९, १२५ तसेच महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. २८ सप्टेंबर रोजी पहाटे गुन्हा दाखल झाला. सहायक निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
दवाखान्यात सलाईन लावलेले दोन रुग्ण
छाप्यादरम्यान संबंधित गाळ्यात दोन रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असल्याचे आढळून आले. या दोन्ही रुग्णांना सलाईन लावण्यात आले होते. वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे गंभीर उपचार केले जात असल्याने रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला होता. जत तालुक्याच्या पूर्व भागात अशाप्रकारे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने संपूर्ण पूर्व भागात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.