

ईश्वरपूर : येथील शनिमंदिरच्या पाठीमागे रस्त्याकडेला भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या शेतकरी, व्यापाऱ्यांच्या जागेवर एका व्यावसायिकाने मुद्दामहून पाणी सोडल्याने त्यांची तारांबळ उडाली. यावेळी शेतकरी चांगले संतप्त झाले होते. काहींनी त्याव्यवसायिकाशी वाद घालत संतप्त प्रतिक्रिया दिल्या. जागेसाठी वरचेवर होणाऱ्या वादाने शेतकरी त्रस्त आहेत.
भाजीमंडईचे काम सुरू असल्याने शहरातील गुरुवार, रविवारचे दोन्ही बाजार तहसिल चौक, यल्लमा चौक, शनी मंदिर, न्यायालय परिसरात भरत होते. मात्र, व्यापाऱ्यांनी याला विरोध केल्याने रविवारचा आठवडा बाजार तहसिल चौकपासून मार्केट यार्ड पर्यंत भरवण्याचे पालिकेच्या बैठकीत ठरले आहे. गुरुवारचा बाजार अंबिका उद्यान परिसरात भरवण्याचे ठरले आहे. रविवारचा बाजार मोठा भरत असल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येतात. त्यामुळे बाजार पुन्हा शनी मंदिर, न्यायालयाच्या परिसरातपर्यंत पसरू लागला आहे. परिसरातील व्यवसायिकांच्या गाळ्यासमोरच भाजीपाला विक्रते बसल्याने पुन्हा वाद वाढू लागले आहेत. बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांना जागा मिळणे मुश्किल होत आहे.
रविवारी सायंकाळी एका दुकानासमोर भाजीपाला विकण्यासाठी शेतकरी बसले होते. त्यावेळी दुकानातील कर्मचाऱ्याने रस्त्यावर पाणी सोडले. कोणाच्या काही लक्षात यायच्या आत पाणी विक्रीसाठी ठेवलेल्या भाजीपाल्याखाली शिरले. पाणी आल्याने माल उचलण्यासाठी शेतकरी, विक्रते यांची चांगलीच धावपळ झाली. काही शेतकऱ्यांनी संबंधित व्यवसायिकाला खडे बोल सुनावले, मात्र त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काहींचा भाजीपालाही पाण्याने भिजला.