

ईश्वरपूर : प्रॉपर्टी कार्डवरील क्षेत्र दुरुस्तीच्या कामासाठी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात ५० हजार रुपयांची लाच घेताना एका महिला कर्मचाऱ्यासह दोघांना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी घडलेल्या या कारवाईने प्रशासकीय इमारत परिसरात खळबळ उडाली आहे.
परिरक्षण भूमापक सोनाली सचिन आवटी (वय ४७, रा. सावर्डे गल्ली, आष्टा) आणि मुख्यालय सहाय्यक सुनील गणपती पाटील (वय ४८, रा. कोडोली, ता. पन्हाळा) अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदं (अधिनियम) १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
तक्रारदार यांनी आपल्या वडिलांच्या नावावरील प्रॉपर्टी कार्डवरील क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी ईश्वरपूर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. हे काम कार्यालय प्रमुखांकडून करून देण्यासाठी मुख्यालय सहाय्यक सुनील पाटील याने तक्रारदाराकडे सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागितली होती.
त्यानंतर परिरक्षण भूमापक सोनाली आवटी यांनी सुनील पाटील याच्याशी चर्चा करून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच घेण्याचे निश्चित केले. दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १९ ऑगस्ट रोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत अधिकृत तक्रार अर्ज दिला होता. सोमवारी दि. २१ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या अर्जाची पडताळणी केली असता, संशयितांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले.
त्यानुसार मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण, पोलिस प्रीतम चौगुले, अजित पाटील, मनोज निळकंठ, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, ऋषिकेश बडणीकर, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश जाधव, सागर नायकुडे, विठ्ठलसिंग राजपूत व जितेंद्र कदम यांच्या पथकाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात सापळा रचला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भूमी अभिलेख कार्यालयात सोनाली आवटी व सुनील पाटील यांना तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.