Sangli Crime | ईश्वरपूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!

मध्यरात्री चार-पाच संशयित; सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला
theft
theftPudhari
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : शहराच्या पश्चिम भागातील पद्मावती नगरमध्ये चोरट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चार ते पाच संशयित चोरटे परिसरात फिरताना आढळून आले. जागरूक नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला आणि चोरीचा प्रयत्न फसला. नागरिकांच्या आवाजाने चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळ काढला.

चोरट्यांचा संशयास्पद वावर लक्षात येताच नागरिकांनी एकमेकांना फोनवरून सावध केले आणि तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनीही तत्परता दाखवत घटनास्थळी भेट दिली. मात्र, रात्रीच्या वेळी अशा प्रकारे टोळक्याने फिरणाऱ्या संशयितांमुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पद्मावती नगर परिसरात रात्रीची पोलिस गस्त वाढवावी, संशयास्पद व्यक्तींवर कडक नजर ठेवावी आणि नियमित पोलिस पेट्रोलिंग करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. चोरीची एखादी मोठी घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या चोरीच्या प्रयत्नाचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.

प्रत्येकाने आपल्या घराची आणि परिसराची सुरक्षितता जपावी, तसेच अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन रहिवासी डॉ. जयकर शिंदे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.