Sangli News : पाटबंधारे विभागाकडून तीन दिवस उपसाबंदी शिथिल

कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा
Sangli News : पाटबंधारे विभागाकडून तीन  दिवस उपसाबंदी शिथिल
AI photo
Published on
Updated on

सांगली : जलसंपदा विभागाच्या सांगली पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या भागांत लागू केलेला उपसाबंदीचा आदेश तात्पुरता शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार २४ ते २६ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीसाठी उपसाबंदी उठवण्यात आली आहे.

सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी उपसाबंदी शिथिल करण्याबाबतचे अधिकृत पत्र महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) सांगली मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना पाठवले आहे.

या निर्णयामुळे कृष्णा नदीवरील मौजे अटके (ता. कराड, जि. सातारा) ते डिग्रज कोल्हापूर पद्धतीच्या (को.प.) बंधाऱ्यापर्यंतचा (ता. मिरज, जि. सांगली) उजवा तीर, तसेच डिग्रज को.प. बंधारा ते महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत असणाऱ्या राजापूर को.प. बंधाऱ्यादरम्यानचा सांगली पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील भाग असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यासोबतच मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सांगली पाटबंधारे विभागांतर्गत येणारे सर्व तलाव, तसेच मोरणा नदी आणि त्यावरील सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दोन्ही तीरांवरील उपसाबंदी शिथिल करण्यात आली आहे.

दरम्यान, कृष्णा नदीकाठच्या व इतर तालुक्यांमध्ये तीन दिवसांसाठी उपसाबंदी शिथिल करण्यात आली असली, तरी जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व तलावांवर मात्र उपसाबंदीचा आदेश कायम राहणार आहे. याव्यतिरिक्त उपसाबंदीच्या मूळ आदेशातील इतर कोणत्याही अटींमध्ये बदल करण्यात आलेला नाही, असेही पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news