

सांगली : केंद्रीय तपास यंत्रणांचे बनावट अधिकारी बनून, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत सावळज (ता. तासगाव) येथील एका सेवानिवृत्त वृद्धाला तब्बल 59 लाख 9 हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सांगली सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य संशयितांना पुण्यातील हडपसर आणि मगरपट्टा परिसरातून अटक केली. अबु हुसेन समसुल आलम (वय 38, रा. पश्चिम बंगाल) आणि सुशील अकील राम (वय 34, रा. पश्चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सावळज येथील निवृत्त कर्मचारी अण्णासाहेब बाळगोंडा पाटील (वय 61) यांना 8 ते 16 जानेवारी या कालावधीत सायबर भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढले. स्वतःला पोलिस अधिकारी भासवून पाटील यांच्याशी संपर्क साधला. आपला बनावटपणा खरा वाटवा, यासाठी त्यांनी व्हॉट्सॲप प्रोफाईलवर पोलिस अधिकाऱ्यांचे फोटो लावले होते. तसेच, सीबीआयचे बनावट लोगो, इन्कम टॅक्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाचे बनावट पत्र व्हॉट्सॲपवर पाठवून पाटील यांच्यावर दबाव निर्माण केला. त्यानंतर व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्टची भीती दाखवली आणि कायदेशीर कारवाई टाळण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून तब्बल 59 लाख 9 हजार रुपये उकळले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बँक खात्यांचा छडा लावला असता, फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी 29 लाख 60 हजार रुपये ज्या बँक खात्यांवर जमा झाले होते, त्या खात्यांचा थेट संबंध या दोन संशयितांशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी पुण्यात सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्नेहा गिरी, सहायक निरीक्षक रूपाली बोबडे, अंमलदार सतीश आलदर, करण परदेशी, रेखा कोळी, रूपाली पवार, सलमा इनामदार, कॅप्टन गुंडवाड, विजय पाटणकर, अजय बेंदरे, विवेक साळुंखे, अजय पाटील, अभिजित पाटील, इम्रान महालकरी, शांतव्वा कोळी आणि दीपाली नेटके यांच्या पथकाने केली.