

उध्दव पाटील
सांगली : राज्यात नवीन चार अप्पर जिल्हाधिकारी आणि ४७ नवीन अप्पर तहसील कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. यानिमित्ताने स्वतंत्र सांगली तालुक्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
सांगली तालुका व्हावा, ही मागणी गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून होत आहे. अलीकडे या मागणीने जोर धरला. ऑक्टोबर २०२० मध्ये अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले. स्वप्न सांगली स्वतंत्र तालुक्याचे होते, पण सांगली अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले. महसूल विभागाची कामे सांगलीतून होऊ लागली. मिरजेचा हेलपाटा थांबला. पण पुरवठा विभाग, संजय गांधी विभाग, रोजगार हमी आदी विभागांचे कामकाज अद्यापही मिरज तहसील कार्यालयातून होत आहे. सांगली तालुका झाल्यास पंचायत समितीसह तालुकास्तरीय सर्वच कार्यालये सांगलीत सुरू होतील. नागरिकांची सोय होईल. त्यामुळे स्वतंत्र सांगली तालुक्यासाठी राजकीय ताकद लागणे गरजेचे आहे.
सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. मात्र तालुका मिरज आहे. सांगली, कुपवाड, वानलेसवाडीसह मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील सव्वीस गावे, असा २९ गावांचा सांगली तालुका व्हावा, ही मागणी तीस-पस्तीस वर्षांपासूनची आहे. सांगली तालुक्यासाठी विधिमंडळात अनेकदा चर्चा झाली. आश्वासने दिली गेली. मात्र केवळ अप्पर तहसील कार्यालय सुरू करून सांगली तालुक्याच्या मागणीची बोळवण केली आहे.
स्वतंत्र तालुका गरजेचा
२०११ च्या लोकसंख्येनुसार मिरज तालुक्याची लोकसंख्या तब्बल ८,५४,५८१ आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत ही लोकसंख्या अडीचपट ते सहापट आहे. मिरज तालुक्याचे क्षेत्रफळ ९२६.१० चौरस किलोमीटर आहे. सांगली व मिरज या दोन प्रमुख शहरांमुळे सध्याच्या मिरज तालुक्याची लोकसंख्या सतत वाढत आहे. मिरज तहसील कार्यालयाच्या कामकाजावर ताण वाढत आहे. मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील जनतेला तहसील कार्यालयातील कामकाजासाठी सांगली ओलांडून मिरजेला हेलपाटे मारावे लागतात.
राजकीय इच्छाशक्ती असेल तर..!
दि. २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा जिल्ह्याचे नामकरण सांगली जिल्हा असे झाले. त्यावेळी सांगली जिल्ह्यात सहा तालुके होते. दि. १ एप्रिल १९६५ रोजी आटपाडी आणि कवठेमहांकाळ हे दोन तालुके निर्माण झाले. पुढे १९९९ मध्ये पलूस तालुका आणि २८ मार्च २००२ रोजी कडेगाव तालुक्याची निर्मिती झाली. सांगली, आष्टा या दोन तालुक्यांची मागणी जुनी आहे. जत तालुक्याच्या विभाजनाची मागणीही जुनीच आहे. मात्र या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. कडेगाव आणि पलूस हे दोन तालुके मात्र निर्माण झाले. प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असेल तर स्वतंत्र तालुका होऊ शकतो, याचे ते एक हे उदाहरण आहे.
महसूलचे कामकाज सुरू, पण..!
सांगलीत अप्पर तहसील कार्यालय सुरू आहे. महसूलसंदर्भातील सर्व कामकाज सांगलीतून होत आहे. लोकांची ती सोय झाली आहे. पण पुरवठा विभाग, संजय गांधी विभाग, रोजगार हमी या विभागांचे कामकाज अद्यापही मिरज तहसील कार्यालयाकडे आहे. खरे तर हे विभाग सर्वसामान्य जनतेशी जास्त निगडित आहेत. सर्वसामान्य जनतेचे काम या विभागांशीच अधिक असते. हे विभाग मात्र अद्याप सांगली अप्पर तहसील कार्यालयाकडे आलेले नाहीत. ते मिरज तहसील कार्यालयाकडेच आहेत. त्यामुळे मिरज पश्चिम भागातील जनतेला अजूनही मिरजेचे हेलपाटे चुकलेले नाहीत. सांगली स्वतंत्र तालुका निर्माण झाल्यास सांगली पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, उपकोषागार कार्यालय, सहा. निबंधक सहकारी संस्था यांसह तालुकास्तरीय सर्वच कार्यालये सांगलीत सुरू होतील.
सांगली अप्पर तहसील कार्यालयाकडील गावे...
सांगली शहर व उपनगरे, सांगलीवाडी, कुपवाड, वानलेसवाडी, बामणोली, जुनी धामणी, नवी धामणी, अंकली, हरिपूर, कवठेपिरान, समडोळी, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, तुंग, कर्नाळ, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, पद्माळे, बिसूर, कावजी खोतवाडी, वाजेगाव, नांद्रे, नावरसवाडी, माधवनगर, बुधगाव.