Sangli News : जुनी टाकी धोकादायक, तर नवी निकृष्ट

इनाम धामणीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांचा संताप
Sangli News
जुनी टाकी धोकादायक, तर नवी निकृष्ट
Published on
Updated on

हरिपूर : इनाम धामणी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अनेक वर्षांपासून वापरात असलेली पाण्याची जुनी टाकी अत्यंत धोकादायक आहे. नव्याने उभारलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामातही निकृष्ट दर्जा आणि मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावातील वसंत भोसले, प्रमोद माळी, विनोद कदम, प्रकाश कोट्याळ, रमेश मलमे, महावीर कवठेकर, रोहन पाटील, हणमंत दडणावर, राहुल खंडागळे आदींनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जुन्या पाण्याच्या टाकीच्या आतील सिमेंट-काँक्रीटचे मोठे तुकडे निखळून पडत आहेत. त्यामुळे आतील लोखंडी सळया उघड्या पडून त्या पूर्ण गंजल्या असून संपूर्ण संरचना कमकुवत झाली आहे. ही टाकी कधीही दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते, अशी भीती निवेदनात व्यक्त केली आहे. गंभीर बाब म्हणजे, पाच वर्षांत या टाकीची एकदाही स्वच्छता केली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, अडीच वर्षांपूर्वी ग्रामसभेत जुन्या टाकीची स्वच्छता करण्याची मागणी केली होती. मात्र तत्कालीन ग्रामसेवक आणि तत्कालीन सरपंच यांनी "नवीन टाकी एका महिन्यात सुरू होणार असल्याने जुनी टाकी धुण्यावर खर्च करणे म्हणजे पैशांचा अपव्यय ठरेल," असे सांगून ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतरही नवीन टाकी कार्यान्वित झाली नाही.

दरम्यान, नव्या टाकीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच विविध ठिकाणी गळती सुरू झाली असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. तसेच कार्यारंभ आदेशानुसार अनेक कामे अपूर्ण असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. काम पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत संपून दीड ते दोन वर्षे उलटून गेली असतानाही संबंधित कंत्राटदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नाही. नियमानुसार संपूर्ण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून, टाकी सलग दोन महिने पूर्ण क्षमतेने भरून तिची चाचणी घेणे आणि पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर कामाचा ताबा स्वीकारला जातो. मात्र इनाम धामणीमध्ये अनेक कामे अपूर्ण असतानाच टाकीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news