

आष्टा ः खासगी सावकारीचा खटला मागे घेण्याच्या कारणावरून कोरेगाव (ता. वाळवा) येथील एका महिलेला काठीने बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आष्टा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्मिता जितेंद्र देसाई (वय 39, रा. जैन गल्ली, कोरेगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मनोज धनपाल कवठेकर (रा. वाळवा) आणि राजीव मधुकर देसाई (रा. कोरेगाव) या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. 16 रोजी दुपारी 12:30 वाजता स्मिता देसाई आपल्या घराच्या जिन्यावरून जात असताना संशयित मनोज कवठेकर याने त्यांना अडवले. ‘सावकारीची केस घालून माझे काय बिघडवलेस? केस मागे घे, नाही तर तुझ्या पतीला संपवून टाकीन’, असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. तसेच हातातील काठीने स्मिता यांच्या उजव्या हातावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्याचवेळी दुसरा संशयित राजीव देसाई यानेही, ‘खटला मागे घे, तुझ्या पतीला मागेच संपवले असते, असे म्हणत त्यांना ढकलून दिले. स्मिता यांचे पती जितेंद्र देसाई यांनाही संशयितांनी दमदाटी व शिवीगाळ केली. घटनेनंतर स्मिता देसाई यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आष्टा पोलिस करत आहेत.