

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्यासमोर अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी राजीनामा द्यावा व कारखान्याचे सर्व कर्ज फेडावे, या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन शनिवारी सहाव्या दिवशीही सुरूच राहिले. आंदोलनस्थळी उपस्थित राहून संचालक विश्वास थोरात आणि संचालिका जयश्री अहिर यांनी आंदोलकांना पाठिंबा दर्शविला. त्यांच्या उपस्थितीचे सभासदांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
सकाळी क्रांतिवीर नागनाथ अण्णा यांना अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी कारखान्याशी संबंधित अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. सर्व अधिकारी, उपस्थित संचालक तसेच आंदोलक नेते किरण नायकवडी, गौरव नायकवडी व केदार नायकवडी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत कारखान्याच्या सर्व खात्यांचा आढावा घेण्यात आला. येणारा गळीत हंगाम वेळेत व सुरळीत पार पडेल, असा विश्वास कार्यकारी संचालक शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वर्षभर विनामोबदला काम करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती गौरव नायकवडी यांनी दिली. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामावर हजर राहावे, असे आवाहनही करण्यात आले. आज आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. रणरणत्या उन्हातही शेतकरी ठामपणे आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांच्या भोजन व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हा सर्वांच्या जीवनमरणाचा प्रश्न असून नागनाथ अण्णांचा कारखाना हे स्मारक आहे, ते वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे आवाहन किरण नायकवडी यांनी केले. समेटासाठी प्रयत्न सुरू असले तरी आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. हा आमचा घरगुती प्रश्न नसून सर्व सभासदांचा प्रश्न आहे. कर्ज फेडून अध्यक्षांनी राजीनामा दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा किरण नायकवडी यांनी दिला.