Sangli News : ‘हुतात्मा‌’समोर संचालकांची खुली सभा

अध्यक्ष वैभव नायकवडींचे अधिकार उपाध्यक्ष भाडळकरांकडे; ठराव मंजूर
Hutatma Sugar Factory
Hutatma Sugar Factory
Published on
Updated on

वाळवा : येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याची संचालक सभा उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या प्रांगणात पार पडली. या सभेला आंदोलक, सभासद, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.

आंदोलक नेते किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांनी संचालक मंडळाची सभा सर्वांसमोर घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी 10 वाजता सभेला सुरुवात झाली. सचिव मुकेश पवार यांनी नोटीस वाचन करून मागील सभेचे इतिवृत्त मांडले, त्यानंतर विविध नवीन ठराव मंजूर करण्यात आले.

अध्यक्ष वैभव नायकवडी यांचे सर्व अधिकार उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्याकडे सोपवण्याचा ठराव करण्यात आला. तसेच वैभव नायकवडी यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, वाहतुकीसाठीची थकीत रक्कम कायदेशीर मार्गाने वसूल करावी, ऊस तोडणीचे करार त्वरित करावेत, नोकरभरतीमध्ये कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, असे ठराव संमत केले. कार्यकारी संचालक शिवाजी पाटील व विभाग प्रमुखांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. आगामी गळीत हंगामासाठी आतापर्यंत 5870 एकर ऊस नोंद झाली असून हा आकडा लवकरच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कारखान्याच्या पेट्रोल पंपाचा हुतात्मा बझारशी केलेला करार चुकीचा असून त्यातून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत, तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच साखर विक्री करारामुळे कारखान्याचे नुकसान होत असल्याने पेट्रोलपंप व साखर विक्री दुकान कारखान्याच्या ताब्यात घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.

यावेळी केदार नायकवडी यांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करत त्यांच्यासाठी विमा योजना लागू करण्याची घोषणा केली. किरण नायकवडी यांनी, कारखान्याचे जुने वैभव परत मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. गेल्या 13 दिवसांपासून शेतकरी कारखान्यासमोर ठिय्या मारून बसले आहेत. साडेपाचशे कोटींच्या कर्जफेडीची आणि अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र, अद्याप अध्यक्ष आंदोलनाकडे फिरकले नसल्याने सभासदांमध्ये संताप वाढत असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news